ॲप आधारित वाहनचालकांवर परिवहन विभागाचा बडगा; प्रवाशांची लूट रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ॲप-आधारित वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी विशेष मोहीम राबवली असून, अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल २६३ वाहनांवर ₹३.८८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमभंग करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
सरनाईक म्हणाले की, ॲप-आधारित वाहने चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी-जास्त भाडे आकारणे गुन्हा मानला जाईल. चालकांना प्रवास भाड्यापैकी किमान ८० टक्के हिस्सा देणे कंपन्यांना बंधनकारक आहे. मात्र काही चालक परवाना न घेता आणि अतिरिक्त शुल्क आकारून सेवा देताना आढळले असून, त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल झाले आहेत.
सध्याच्या दरानुसार ऑटो रिक्षासाठी पहिल्या १.५ किमी प्रवासाचे भाडे ₹२६, काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी ₹३१ असून त्यानंतर प्रति किमी ₹२०.६६ आकारले जाईल. एसी वाहनांना १० टक्के अधिक भाडे आकारण्याची परवानगी आहे. तर ‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम २०२५’ नुसार ई-बाईक व इलेक्ट्रिक दुचाकी प्रवासासाठी पहिल्या १.५ किमी साठी ₹१५ तर नंतर प्रति किमी ₹१०.२७ इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे.
शासनाने लागू केलेल्या ‘ॲग्रिगेटर्स पॉलिसी’नुसार परवाना नसलेल्या ॲप कंपन्यांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे. “मुंबईत बेकायदेशीर वाहनचालकांनी तातडीने नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई अपरिहार्य ठरेल,” असा इशारा परिवहन विभागाचे सचिव व MMRTA चे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळस्कर यांनी दिला.
एकंदरीत, प्रवाशांची फसवणूक रोखणे आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे या उद्देशाने शासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू केल्या आहेत. आगामी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.