कल्याण न्यायालय परिसरात कैद्यांचा पोलिसांवर हल्ला; एक पोलीस जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत चार कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला, ज्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. कल्याण कोर्टात ८ आरोपींना हजर केल्यानंतर, त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली.
घटनेनुसार, जेलमध्ये नेण्यासाठी पोलीसांनी गाडी बोलावली होती, मात्र गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे बसण्यास सांगितले. या आदेशाने संतापलेल्या चार आरोपींनी पोलीसावर हल्ला करून त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली आणि शिविगाळ केली. या आरोपींची नावे आकाश वाल्मीकी, गणेश उर्फ शालु मरोठीया, योगींदर उर्फ भोलु धरमवीर मरोठीया आणि विवेक शंकर यादव अशी आहेत.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. कल्याण न्यायालय परिसरात कैद्यांचा हा हल्ला शहरात खळबळ उडवणारा ठरला आहे.