कांदिवलीत पुजाऱ्याने तरुणीचा विनयभंग; तक्रारीनंतर देवासमोरच फास घेत आत्महत्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – कांदिवली पश्चिम, लालजीपाडा परिसरातील तारकेश्वर महादेव मंदिरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराचा पाच वर्षांपासून पुजारी असलेल्या राजेश स्वामी (मूळ मध्य प्रदेश, ग्वालियर) यांनी दर्शनासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केला.
पुजाऱ्याने तरुणीला आक्षेपार्ह संदेश पाठवले, घरी बोलावले आणि दार बंद करून शरीर सुखाची मागणी केली. मुलीने घाबरल्या अवस्थेत पालकांना ही घटना सांगितली. पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल होताच राजेश स्वामी यांनी बदनामी व अटक होण्याच्या भीतीने देवासमोरच फास घेत आत्महत्या केली.
या प्रकरणी पोलीसांनी एडीआर दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मंदिरात आणखी काही मुलींवर असे कृत्य झाले आहे की नाही, याचा तपास सुरू आहे. पुजाऱ्याच्या स्वतःच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.