टेंभी नाका देवी उत्सवावरून यंदाही दोन्ही शिवसेना आमनेसामने? ठाण्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका देवी उत्सवाला यंदाही राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. यामुळे कोणताही वाद टाळण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. जय अंबे मा नवरात्र उत्सवाची सुरुवात आनंद दिघे यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे व राजन विचारे एकत्र देवीच्या आगमनाला सहभागी होत. मात्र, २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गट वेगळे झाले.
त्याच वर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजन विचारे देवीच्या आगमनावेळी आमनेसामने आले होते. तेव्हा घोषणाबाजीमुळे वातावरण तापले होते. पोलिस हस्तक्षेपानंतरच परिस्थिती सुरळीत झाली. तेव्हापासून देवीच्या आगमनावेळी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. अलिकडेच खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे यावर्षी देवीच्या आगमनावेळी पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रश्मी ठाकरे या २०२२ सालीही राजन विचारे यांच्यासह देवीची ओटी भरण्यासाठी आणि आरतीसाठी आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत घोषणाबाजी झाली होती. तसेच, “रश्मी ठाकरे किंवा ठाकरे गटाचे नेते आल्यावर मंडळातील एसी बंद केला जातो, लाईट घालवले जातात” अशा प्रकारचे आरोप ठाकरे गटाकडून दरवर्षी केले जातात. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाही देवीच्या आगमनावेळी वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीही विशेष खबरदारी घेतली जात आहे.