सफाळ्यात घडले भीषण अग्निकांड…
पहाटे लागलेल्या आगीत पश्चिमेकडील सहा दुकाने जळून खाक
पालघर / नवीन पाटील
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथे रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार, एका दुकानातील फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या आगीत बेकरी, चिकन, केक अशा दुकानांसह सलून, डेअरी आणि डीवाइन नामक एक मोबाईलचे असे सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. दुकानदारांच्या अनेक वर्षांच्या व्यवसायावर एका क्षणात पाणी फिरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि पाणी व इतर साधनांच्या सहाय्याने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीच्या तीव्रतेमुळे दुकाने काही मिनिटांतच जळून खाक झाली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी धावपळ उडाली.
आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानदारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ठेवलेला माल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ व इतर साहित्य जळून खाक झाले असून व्यापाऱ्यांमध्ये हतबलतेची भावना दिसून येत आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व नगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आग लागण्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.
बॉक्स कोट…
यापूर्वी देखील सफाळे बाजारपेठीतील एका साडीच्या दुकानाला रात्री अचानक आग लागून बाजूच्या दोन ते तीन दुकानांना त्याची झळ लागून मोठे नुकसान झाले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, बाजारपेठेतील दुकाने व व्यापारी असणाऱ्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच आगीसारख्या आपत्तीपासून बचावासाठी अग्निशमन यंत्रणा व अन्य सुविधांची उपलब्धता उभारण्याची मागणी केली आहे.