गावी जायच्या पैशांवरून पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या; कांदिवलीत धक्कादायक घटना
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – गावी जायला पैसे दिले नाहीत, या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दसा राणा व त्याची पत्नी हिमेंद्री राणा हे दोघे मूळचे ओडिशातील रहिवासी असून कांदिवली परिसरात एका बांधकाम साईटवर मजुरीचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी दसा राणा गावी जाण्याचा आग्रह धरत होता. त्यासाठी त्याने पत्नी हिमेंद्रीकडे खर्चासाठी पैसे मागितले. मात्र हिमेंद्रीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.
हा वाद चिघळत जाऊन शनिवारी मध्यरात्री दसा राणाने संतापाच्या भरात पत्नी हिमेंद्री हिचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हत्या केवळ पैशांच्या कारणावरून घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.