ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ‘रावण टोळी’च्या ९ सदस्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने एका मोठ्या दरोड्याची योजना उधळून लावली आहे. चिखलीतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ‘रावण टोळी’च्या नऊ सदस्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, राऊंड, कोयता, गुप्ती आणि मिरची पावडरसह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या साहित्याची एकूण किंमत १५.२५ लाख रुपये आहे. या संपूर्ण ऑपरेशनचा थरार हा अंगावर काटा आणणारा आहे. मात्र पोलीसांना मोठ्या चातुर्याने या दरोड्याचा प्लॅन उधळवून लावला आहे. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.५० वाजता गुंडा विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली. पाटीलनगर पाण्याच्या टाकीच्या पुढे असलेल्या खदाणीजवळ इद्रायणी नदीच्या काठालगत दोन पांढऱ्या रंगाच्या गाड्या उभ्या आहेत. त्यात ८ ते ९ संशयित इसम शस्त्र घेऊन थांबले आहेत. ही बातमी मिळताच सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने यांनी तातडीने वेगवेगळ्या टीम तयार करून सापळा रचला. पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे एकूण नऊ संशयित सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांनी त्यांची नावे उघड केली.
अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव (२८),अभिषेक हरकळे उर्फ बकासुर थिमाजी पवार (२२),यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे (२१),शुभम गोरखनाथ चव्हाण (३०),प्रद्युम्न राजकुमार जवगे (२२), रा. चाकण, आणि सोहन राजू चंदेलिया (२३) त्यांच्यासोबत तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान, आरोपी अनिरुद्ध उर्फ बाळ्या जाधवने कबूल केले की ते नऊजण मिळून पाटीलनगर, चिखली येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी आरोपींच्या स्वीफ्ट आणि ऑडी गाड्यांमधून दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. यामध्ये पिस्तूल, राऊंड, लोखंडी कोयता, गुप्ती, मिरची पावडर आणि दोरी यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस उप-निरीक्षक समीर लोंढे यांनी चिखली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपींना चिखली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त एस. डी. आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक एच. डी. माने आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.