चेंबूर छेडानगरचा तथाकथित भूखंड माफिया दिवाकर प्रजापती फरार; टिळकनगर पोलिसांचा शोध सुरू
मुंबई – चेंबूर छेडानगर परिसरात लोकांचे दुकाने व गाळे भाडे तत्वावर घेऊन बोगस कागदपत्रे तयार करून कब्जा सांगणारा तथाकथित भूखंडमाफिया दिवाकर सोनई प्रजापती गेल्या दोन-तीन दिवसांपासून फरार झाला असून तिलकनगर पोलिस त्याच्या शोधात आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी प्रजापतीने घाटकोपर–मानखुर्द लिंक रोडवरील छेडानगर, जय अंबे नगर येथे शंकर त्रिमुखे यांच्या मालकीचा गाला क्रमांक ८ भाड्याने घेतला आणि तिथे सफलता रेसिडेन्सी नावाचे हॉटेल सुरू केले. त्यानंतर त्याने शेजारील महेश आचार्य यांच्या मालकीचा गाला क्रमांक ७ भाड्याने घेतला. दोन्ही गाळे एकत्र करून प्रजापतीने लॉजिंग व्यवसाय सुरू केला.
यानंतर त्याने कथित बनावट दस्तऐवजांच्या आधारे गाळ्यांवर मालकीचा दावा केला. यासाठी त्याने बोगस कागदपत्रे तयार करून पत्नी स्वाती प्रजापतीच्या नावावर दाखल केली. मात्र, न्यायालयात हे सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, मूळ मालक महेश आचार्य आणि शंकर त्रिमुखे यांनी आपापले गाळे परत ताब्यात घेतले. याशिवाय, प्रजापती दाम्पत्य व त्यांचा कथित साथीदार कार्तिक नाडार यांनी काही शेट्टी समाजातील लोकांचीही करोडो रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले असून याबाबत पीडितांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सध्या या सर्व प्रकरणामुळे दिवाकर प्रजापती, त्याची पत्नी स्वाती प्रजापती आणि कार्तिक नाडार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. टिळकनगर पोलीस या स्वयंघोषित माफियाचा शोध घेत असून लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.