उल्हासनगरात पुन्हा बारवर धाड; तीन बारवर गुन्हे दाखल, अश्लील चाळे थांबता थांबेना

Spread the love

उल्हासनगरात पुन्हा बारवर धाड; तीन बारवर गुन्हे दाखल, अश्लील चाळे थांबता थांबेना

“छमछमला पुन्हा चाप; उल्हासनगरात आचल, हंड्रेड आणि ऍपल बारवर कारवाई”

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर – वारंवार कारवाई करूनही शहरातील डान्स बारमध्ये बेकायदा धंदा आणि अश्लील चाळे सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांत उल्हासनगरच्या परिमंडळ चारच्या हद्दीत तीन बारवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांचा बडगा उगारूनही ‘छमछम’ सुरु ठेवण्याचा बारमालकांचा हट्ट कायम असून, आता पुढे पोलिसांकडून कोणती कठोर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात अनेक डान्स बार कार्यरत असून, त्यांना परवानगी दिलेल्या विहीत वेळा व नियमांचे पालन केले जात नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस तसेच बाहेरील विशेष पथके याकडून अनेकदा छापे टाकले गेले आहेत. नियमबाह्य बांधकामे, अंतर्गत बदल यावरही कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाया तात्पुरत्याच ठरल्या आणि बारमालकांनी पुन्हा बेकायदा प्रकार सुरू ठेवले.

नुकत्याच झालेल्या कारवाईत कॅम्प-३ मधील आचल बार आणि विठ्ठलवाडी येथील हंड्रेड बार यावर धाड टाकण्यात आली. आचल बारमध्ये महिला वेटर्सकडून तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांना सेवा दिली जात होती. तसेच ग्राहकांसमोर अश्लील चाळेही केले जात असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी मालक निधी शेट्टी, व्यवस्थापक रविकांत त्रिपाटी, ३ पुरुष वेटर, १० महिला व इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंड्रेड बारमध्येही याच प्रकारचे कृत्य सुरू असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे बारमालक बालेंद्र सिंग, ६ महिला व आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, परवानगीपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवल्याप्रकरणी ऍपल बारविरुद्धही कारवाई करण्यात आली. यामध्ये मालक रोहित पांडव आणि व्यवस्थापक दुर्गेश पांडे यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे.

या सलग कारवायांमुळे शहरातील डान्स बारवरील ‘छमछम’ काही काळासाठी तरी थांबेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या बेकायदा प्रकारांविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींचा आवाज उठत नसल्याने बारमालकांना अधिकच फावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कठोर व निर्णायक कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon