ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरींच्या चिंतेने अजून एक आत्महत्या; बीडमध्ये बापाचं टोकाचं पाऊल
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – ओबीसी आरक्षणासाठी आता दुसरा बळी गेल्याने समाजमन हेलावले आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील भरत कराड या रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. तर आता बीड जिल्ह्यातील गोरक्ष नारायण देवडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचे नातेवाईक सांगत आहेत. मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी मराठा आंदोलकांच्या आत्महत्या आणि आता ओबीसी आत्महत्यांमुळे समाजमन हेलावले आहे.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जीआर नंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अशात आता ओबीसी बांधवांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडच्या पिंपळनेर येथील गोरक्ष देवडकर यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र आता ओबीसीतलं आरक्षण संपत आहे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांची मुलगी व नातेवाईकांनी सांगितले आहे.
आता माझी जबाबदारी कोण घेणार? माझे वडील तर गेले आहेत अशी भावनिक प्रतिक्रिया आत्महत्या करणाऱ्या देवडकर यांच्या मुलीने दिली आहे. तिच्या या आर्त हाकेने अनेकांच्या काळजात चिर्रर झालं. सरकारने तत्काळ दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली आहे. देवडकर यांच्या तीन मुलींचे लग्न झाले आहे. तर दोन मुली या पोलीस भरतीची तयारी करत आहेत. पती-पत्नी मोलमजूरी करुन संसाराचा गाडा ओढत होते. देवडकर यांच्या आत्महत्येमुळं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.