पतीने पत्नीचे केली निर्घृण हत्या, मुलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आई; भयानक प्रकार पाहून केला आरडाओरड
योगेश पांडे / वार्ताहर
परळी – बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली. हा प्रकार मध्यरात्री घडला परंतु सकाळपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नव्हती.रविवारी सकाळी घरातील मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली. शोभा मुंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आरोपी तिचा पती तुकाराम मुंडे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती, त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील डाबी गावात पती- पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा निघृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. शोभा तुकाराम मुंडे (३७), असे मयत महिलेचे नाव असून, तिच्या पतीनेच, तुकाराम मुंडेने, तिच्या पोटातील आतडे बाहेर काढून तिची हत्या केली. शेजारच्या खोलीत झोपलेली शोभाची दोन मुले आणि एक मुलगी झोपेतून उठून घरात गेली त्यावेळी त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली. हा भयानक प्रकार पाहून त्यांनी आरडाओरडा केला, काही मिनिटांतच गावकरी जमा झाले. घटनेची माहिती परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली.
नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तुकारामला दारूचे व्यसन होते आणि यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. दोन वर्षापूर्वीही त्याने शोभाच्या डोक्यात दगड घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शोभाने त्याच्या विरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता; पण नातेवाइकांनी समजावून सांगितल्यावर तिने तो गुन्हा मागे देखील घेतला होता. पोलिसांनी आरोपी तुकाराम मुंडेच्या शोधासाठी एक पथक पाठवले आहे, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.