मंत्रालयासमोर अचानक पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयाच्या गेट समोर आज वेगळाच प्रकार बघायला मिळाला. मंत्रालयाच्या समोर शुक्रवारी अचानक पाण्याची पाईपलाईन फुटली. यामुळे मंत्रालयाच्या गेटसमोर पाणीच पाणी साचलं. पाण्याचा प्रेशर खूप जास्त प्रमाणात होता. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं. मंत्रालयाच्या समोरील दोन्ही बाजूने जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचलं. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवली. यावेळी पाण्यामधूनचं वाहनं रस्ता काढताना बघायला मिळाली. विशेष म्हणजे मंत्रालय सारख्या संवेदनशील वास्तूच्या गेटबाहेर हा प्रकार घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाण्याचा प्रेशर जास्त असल्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला. याशिवाय मरीन ड्राईव्हकडे जाणारा रस्ता यामुळे खचलेला बघायला मिळाला. ही पाईफलाईन कफ परेडच्या दिशेला जाते. पाईपलाईन फुटल्याची घटना ही आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. पाईपलाईन फुटली तेव्हा मोठ्या प्रमाणात दगड उडाले आणि काही जणांना इजा पोहोचल्याचीदेखील माहिती समोर आली.
पाईपलाईन फुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला. यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. तसेच मुंबई महापालिकेला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालय परिसरात दाखल झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. यानंतर पाण्याचा निचरा करण्यात आला. पण या घटनेमुळे परिसरात पाणीच पाणी बघायला मिळालं. या घटनेचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कफ परेड, आंबेडकर नगर या भागात जाणारी ही पाईपलाईन होती. या भागात काही तास पाणी पुरवठा होणार नाही, अशी देखील माहिती समोर आली. दरम्यान, घटना घडली तेव्हा सुदैवाने मंत्रालय परिसरात गर्दी नव्हती. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. जी पाईपलाईन फुटली ती ६५० एमएमची पाईपलाईन होती. या पाईपलाईनमध्ये अचानक प्रेशर वाढल्याने पाईपलाईन फुटली, अशी माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी आता चौकशी होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.