कल्याणमध्ये परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी; मराठी तरुणीने चपलेने बदडले
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधील एका परप्रांतीय दुकानदाराने दुकानात काम करणाऱ्या मराठी तरुणीला दररोज अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने या दुकानदाराला चक्क चपलेने बदडून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात ‘सौभाग्य लेडीज’ नावाचे दुकान आहे. या दुकानात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीचा परप्रांतीय दुकानदार दररोज छेड काढत होता आणि तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवत होता. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने दुकानदाराला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पीडित तरुणी दुकानदाराला तिच्या चपलेने मारताना दिसत आहे, तर दुकानदार तिची पाया पडून माफी मागत आहे. हा व्हिडिओ ११ सप्टेंबरचा असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी सचिन केदारे यांनी दिली. केदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार भुवन भरादिया हा पीडित तरुणीला अश्लील मेसेज पाठवत होता. तरुणीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीय आणि मनसेचे काही पदाधिकारी दुकानावर पोहोचले आणि त्यांनी दुकानदाराला जाब विचारला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानदाराने यापूर्वीही अनेक मुलींसोबत अशा प्रकारचे गैरवर्तन केले आहे. या गंभीर प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.