चिपळूणमध्ये अल्पवयीन युवतीचा विनयभंग, खेर्डीतील तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
चिपळूण – दुकानावर खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खेर्डी विकासवाडीतील एका तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अयान दिलावर सकवारे (२३, मूळ रहिवासी खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग) असे संशयिताचे नाव आहे. तो सध्या खेर्डी येथे नातेवाइकांकडे वास्तव्यास होता. रविवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास १६ वर्षीय युवती खरेदीसाठी दुकानात गेली असता, संशयिताने तिला अडवून वाद घातला.
त्यानंतर घाबरून युवतीने पळ काढला, मात्र त्याने तिचा पाठलाग करत वाईट हेतूने हात पकडला आणि लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या युवतीने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. तिच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.