महाराष्ट्राचे राज्यपाल बनले देशाचे नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदी भाजप–एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांची भव्य विजयासह निवड झाली आहे. संसद भवनात आज झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त ४५२ मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे, या निवडणुकीत विरोधी आघाडीतील काही खासदारांनी फुट दाखवत एनडीएच्या बाजूने मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.
धनकड यांचा राजीनामा आणि भाजपचे धक्कातंत्र
माजी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपने यावेळीही नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आणि अखेर ते भक्कम विजय मिळवत दिल्लीच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले.
महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंतचा प्रवास
सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती सर्वप्रथम झारखंडच्या राज्यपालपदी झाली होती. त्यानंतर माजी राज्यपाल रमेश बैस यांच्याजागी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपाल म्हणून जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्रातून ते थेट दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर पोहोचत आता देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत.
आगामी घडामोडी
राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्याने आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसांत नव्या राज्यपालाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.