अजित पवारच सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार; माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार अजित पवारच होते. त्यावेळी योग्य ती उच्चस्तरीय चौकशी झाली असती, तर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असता, असा गंभीर आरोप जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला आहे. पांढरे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून अजित पवारांविरोधात जुने आरोप पुन्हा अधोरेखित केले आहेत.
विजय पांढरे यांनी सांगितले की, सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी अजित पवारांना त्या काळात राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसने त्यांची चौकशी सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकार पाडण्यात आले. माधवराव चितळे समितीने दिलेल्या अहवालात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या गोष्टी नमूद केल्या होत्या. स्वतः माधवराव चितळे यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते की, या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार तुरुंगात जातील.
पांढरे यांनी आरोप केला की, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे ‘पाप’ झाकण्याचे काम केले. याला तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाठींबा दिला. चितळे समितीचा अहवाल जाणीवपूर्वक लपवण्यात आल्यामुळे खऱ्या अर्थाने दोषींवर कारवाई होऊ शकली नाही.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली आहे. मात्र, अद्याप या क्लीन चिटला खंडपीठाची मान्यता मिळालेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू नसल्याने तो प्रश्न प्रलंबित आहे, असेही पांढरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील सिंचन घोटाळा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे पांढरे यांच्या वक्तव्यामुळे दिसू लागली आहेत.