पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा छळ; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला. दगडूशेठ हलवाई गणपतीसह शहरातील प्रमुख मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, या धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा वाजवणाऱ्या पथकातील काही सदस्यांनी वार्तांकनासाठी आलेल्या २० वर्षीय महिला पत्रकाराचा छळ केला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. याच ठिकाणी वार्तांकनासाठी आलेल्या महिला पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्याला अचानक अडथळा निर्माण करण्यात आला. ढोल-ताशा पथकातील काही सदस्यांनी त्यांचा मार्ग रोखून छळ केला. याच दरम्यान एका सदस्याने ढोल-ताशा ट्रॉलीचे चाक महिला पत्रकाराच्या पायावर फिरवले. विरोध केल्यावर त्या सदस्याने महिलेला जबरदस्ती स्पर्श करून ढकलले. या प्रकारावर पत्रकाराच्या सहकाऱ्याने आवाज उठवल्यानंतर त्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. धक्कादायक घटनेनंतर पीडित महिला पत्रकाराने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
या गंभीर प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोन ढोल-ताशा पथक सदस्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. घटनेवर आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान छायाचित्रकारांनाही ताल ढोल-ताशा पथकातील वादकांकडून धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. फोटो काढण्यास मनाई करून त्यांना रस्त्यावरून जबरदस्ती हटवण्यात आले. तसेच, बेलबाग चौक परिसरात जिलब्या मारुती मंडळ व मुठेश्वर मंडळाच्या ढोल-ताशा पथकांमध्ये पुढे जाण्याच्या वादातून हाणामारी झाली. मात्र, पोलिस व मंडळ कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करत तणाव वाढण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांचा तपास सुरू असून, गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात अशा घटनांनी निर्माण झालेल्या संतापाची लाट अजूनही कायम आहे.