कामोठ्यातील पारसनाथ ज्वेलर्स चोरी अवघ्या ४ तासांत उघड; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
सुधाकर नाडार / मुंबई
नवी मुंबई : कामोठेतील पारसनाथ ज्वेलर्समध्ये झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या मोठ्या चोरीचा गुन्हा कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अवघ्या चार तासांत उघडकीस आणला. बोरीवली स्टेशन परिसरात गस्तीदरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पद हालचाल करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कामोठेतील दागिन्यांच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.
०६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास कामोठे, सेक्टर १२ येथील पारसनाथ ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती. आरोपी करणसिंह नाथूसिंह खारवार (रा. केलवा, जिल्हा राजसमंद, राजस्थान) हा चोरी करून राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांच्या दक्षतेमुळे तो बोरीवलीतच गजाआड झाला. तपासात आरोपीकडून तब्बल ७८ तोळे सोन्याचे दागिने, १८ छोटे हिरे आणि ₹१,३९,२०० रोख रक्कम असा एकूण ७० ते ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईस पोलीस उपायुक्त परिमंडळ १२ श्री. आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. पो.उ.नि. धिरज वायकोस, पो.उ.नि. अनिकेत शिंदे, पो.ह. राजेश पेडणेकर, पो.ह. करुणेश म्हात्रे यांच्यासह पथकाने तात्काळ तपास करून आरोपीला गजाआड केले.
अवघ्या काही तासांत चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस येऊन मुद्देमाल सुरक्षित हस्तगत झाल्याने स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.