कोल्हापूर हळहळलं!१० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

कोल्हापूर हळहळलं!१० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

कोल्हापुर – गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराचा धोका केवळ वाढत्या वयातील व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता तरुणांमध्येही याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी लहान लहान वयोगटातील मुला- मुलींनाही हार्ट अटॅकचा धोका जाणवत आहे. तशा अनेक घटनाही समोर येत आहेत. कोल्हापूरमध्ये असाच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली असून अवघ्या १० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कोडोली येथे एका १० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी अंत झाला आहे. श्रावण गावडे असे या मुलाचे नाव आहे. गणपती उत्सवाच्या उत्साहात मित्रांसोबत खेळत असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण गावडे हा कोडोली येथील गणेश मंडळाच्या मंडपात आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळत असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थता जाणवल्यामुळे तो खेळ सोडून आपल्या आईच्या कुशीत विसावला. मात्र, आईच्या मांडीवर डोके ठेवताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या घटनेनंतर श्रावणला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने श्रावणच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोडोली गावावर शोककळा पसरली आहे. बालकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे वाढते प्रमाण हे वैद्यकीय क्षेत्रासाठीही एक गंभीर चिंतेचा विषय ठरले आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon