अनुकंपा तत्त्वावर मेगा भरती! तब्बल १० हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावर रिक्त असलेल्या १० हजार जागा तातडीने भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागणार असून, राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवाकाळात निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. परंतु, भरती प्रक्रियेतील दिरंगाईमुळे जागा रिक्त राहण्याचे प्रमाण मोठे होते. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावर भरतीचे मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहेत. या बॅकलॉगला पूर्ण करण्यासाठी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकाच वेळी १० हजार जागा भरण्याचा निर्णय राज्यात प्रथमच घेण्यात आला आहे, ज्यामुळे अनुकंपा भरतीच्या इतिहासात ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व जागा भरल्या जाणार आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. नोकरी मिळाल्यानंतर या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी सरकारने संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अनुकंपा भरतीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.