लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या महिला जोडीदाराच्या प्रियकराची घरात बोलावून हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – बोईसर येथील पास्थल परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या महिला जोडीदाराच्या प्रियकराला घरात बोलावून अगोदर डोळ्यांत मिरचीपूड टाकून नंतर धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी, महिला त्यांचा आठ वर्षाच्या मुलासह फरार झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पास्थल येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये राहणारा सुरेंद्रसिंह काही वर्षांपासून रेखा सिंह आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. रेखाने पहिला पती सोडून सुरेंद्रसोबत संसार थाटला होता. दरम्यान, रेखाची ओळख हरीश सुखाडी या नावाच्या तरुणाशी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. या नात्याची खबर सुरेंद्रला लागताच तो संतापला.
त्याने रेखा करवी हरीशला काही बहाण्याने पत्नी आपल्या घरात बोलावून त्याची निर्दयीपणे हत्या केली. हरीश घरी आल्यानंतर सुरुवातीला त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून नंतर त्याच्यावर हल्ला चढवला, मारहाण करत त्याच्या पोटात धारदार चाकू भोसकला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरीशचा जागीच मृत्यू झाला. या खुनानंतर आरोपी सुरेंद्र आणि रेखा त्यांच्या आठ वर्षीय मुलाला घेऊन घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. पोलिसांना तपासणी दरम्यान, हरीश वर केलेला हल्ला इतका भयंकर होता की त्याचा पूर्ण कोथळाच बाहेर आला होता. तसेच हरीश च्या पोटात चाकूचा एक तुकडा सापडला आहे. त्यामुळे त्यामुळे हे हत्याकांड किती भयंकर आहे याचा अंदाज येऊ शकतो. याप्रकरणी बोईसर तारापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींच्या शोधात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे.