नागपुरातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो ब्रीजची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद
योगेश पांडे / वार्ताहर
नागपुर – महाराष्ट्रातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. नागपूर मध्ये ४ स्तरीय उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावरच सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराचे आंतराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महा मेट्रोला जागतिक दर्जाचा ५.६२ किमी लांबीचा कामठी महामार्गावरील सर्वात लांब डबल डेकर (मेट्रो) व्हायाडक्ट उभारल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तंत्रज्ञानाचा अतुलनीय वापर करून उड्डाणपुलांवर पाच मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहेत. भारतामध्ये सर्वाधिक लांबीचा हा डबल डेकर व्हायाडक्ट स्थापत्यकलेचे आणि तंत्रज्ञानाचे अद्भुत उदाहरण आहे. सिंगल कॉलम पिअरवर उभारलेला हा ५.६२ किमीचा चारपदरी उड्डाणपूल हा पहिल्या स्तरावर महामार्ग, दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमिनीवर आधीच असलेला मार्ग अशा बहुस्तरीय वाहतूक व्यवस्थेने सज्ज आहे. गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक ही ५ मेट्रो स्थानके या उड्डाणपुलावर उभारण्यात आली आहेत.
देशात पहिल्यांदाच १६५० टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात पूर्ण झाले. ‘रिब अँड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करून या अवघड प्रकल्पाची यशस्वी उभारणी करण्यात आली. या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली असून, वेळ आणि इंधनाची मोठी बचत होऊन नागरिकांना दिलासा मिळत आहे.महामेट्रोने यापूर्वी वर्धा मार्गावर ३.१४ किमी लांबीचा डबल डेकर व्हायाडक्ट बांधून २०२२ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. आता कामठी मार्गावरील हा प्रकल्प त्या विक्रमालाही मागे टाकत नवीन इतिहास रचला आहे.