सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासह कंत्राटी कर्मचारी सात हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : साक्री तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी आणि कंत्राटी डेटा ऑपरेटर हे दोघे दहा हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चपराक बसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम कोळशीराम चौरे (वय ४५) आणि कंत्राटी डेटा ऑपरेटर रिझवान रफिक शेख (वय २३) यांच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या नावे साक्री तालुक्यातील पन्हाळीपाडा येथे शेती आहे. या शेतजमिनीवर प्रधानमंत्री प्रसाद सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम जमा झाली होती. या अनुदानाच्या मोबदल्यात चौरे आणि शेख यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने तत्काळ धुळे येथील एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून मागितलेल्या रकमेपैकी सात हजार रुपये शेख याने स्वीकारले. त्याच वेळी एसीबीने दोघांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.