धुळे जिल्ह्यात भीषण अपघात; पोलीस कार उलटली, १ अंमलदार ठार तर २ जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
धुळे – शिरपूर तालुक्यातील शिरपूर-दहिवद फाट्यावर सोमवारी रात्री उशिरा महामार्ग पोलीसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नवल वसावे या पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला असून दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील धुळे-इंदूर महामार्गावर पेट्रोलिंगसाठी पोलीस पथक तैनात होते. यावेळी अचानक त्यांच्या वाहनाचा मागील टायर फुटल्याने कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले. या भीषण अपघातात गाडीतील पोलीस अंमलदार नवल वसावे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
गाडीत असलेले अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पेट्रोलिंगसाठी सतत कार्यरत असलेल्या महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांवर धोका कायम असतो, याची जाणीव या अपघाताने पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली आहे.