नाशिकमध्ये जिलेटीन कांड्यांची निष्काळजीपणे विल्हेवाट; तीन संशयितांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या निष्कामी जिलेटीन कांड्यांची निष्काळजीपणे विल्हेवाट लावण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदीकाठी रविवारी दुपारी तीन गोण्या आढळून आल्या. या गोण्यांमध्ये जिलेटीन कांड्या असल्याचे दिसून येताच परिसरात खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरूटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोणताही अनर्थ होऊ नये, यासाठी पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाला पाचारण केले. तपासणीत या कांड्या निष्क्रिय असल्याचे समोर आले. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे स्फोटक पदार्थ टाकल्याने गंभीर निष्काळजीपणाचे चित्र उघड झाले.
सीसीटीव्हीतून उकल
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता घटनास्थळावर एक मालवाहू वाहन ये-जा करताना आढळले. त्यावरून भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कबुली दिली की, कसारा येथील साल्वो एक्स्प्लोसिव्ह अँड केमिकल प्रा. लि. कंपनीकडून खराब झालेला माल खरेदी करताना त्यात जिलेटीन कांड्या मिळाल्या होत्या. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कामगारांना सांगितले.
यानंतर रिझान शेख आणि दबीर अन्सारी या दोघांनी दादासाहेब गायकवाड सभागृहाजवळ नंदिनी नदीकिनारी तीन गोण्या टाकल्याचे उघड झाले. या निष्काळजी कृत्यामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता.
गुन्हा दाखल
मुंबई नाका पोलिसांनी जाकीर अत्तार, रिझान शेख आणि दबीर अन्सारी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, जिलेटीन कांड्यांची अशी निष्काळजी विल्हेवाट का लावण्यात आली, यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणामुळे संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेतली आहे.