उद्यान बनलं कचराकुंडी; स्थानिक नागरिकांचा रोष
रवि निषाद / मुंबई
मुंबई – घाटकोपर (पूर्व) येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील अंडागळे बाबा उद्यान हे सध्या कचराकुंडी बनल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उद्यानाचे सौंदर्य व शांतता याऐवजी आता दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित उद्यानाची देखरेख मनपा प्रशासनाकडे असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी दामू अंडागळे यांच्याकडे आहे. मात्र रात्रीच्या वेळी काही समाजकंटक उद्यानात कचरा टाकतात. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उरली नाही.
स्थानिक समाजसेवक लक्ष्मण जाधव ऊर्फ बालुभाऊ यांनी या संदर्भात सांगितले की, “उद्यानात काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक मुद्दाम कचरा टाकतात. याचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना होतो. मनपा व पोलिस प्रशासनाने तातडीने या बाबत ठोस उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनावर असेल.” स्थानिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास हे प्रकरण तीव्र होण्याची शक्यता आहे.