३० कोटींचा निधी असूनही उपयोग नाही; कल्याण-डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य, आमदाराच्या घरासमोरही बिकट अवस्था
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कल्याण पूर्वेतील भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या घरासमोरील रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे, आमदारांच्या परिसरातील ही अवस्था असेल, तर इतर भागांची काय स्थिती असेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सुमारे ४२० किमी लांबीचे रस्ते आहेत. यापैकी फक्त २०% रस्ते सिमेंट-काँक्रीटचे आहेत, तर उर्वरित रस्ते डांबरी आहेत. यावर्षी पावसाने जोर धरल्याने डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांना पाठदुखीचा त्रास होत आहे. महापालिका आयुक्त गणपती उत्सवापूर्वी खड्डे बुजविले नाहीत, तर संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांचा हा इशारा निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तरीही खड्डे बुजवले न गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘हा पैसा खड्डे बुजविताना खड्ड्यातच जाणार का?’ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यांमधून झाले. आता विसर्जनाच्या आधी तरी किमान रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.