लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; नंतर ‘जात वेगळी’ म्हणून फसवणूक : आरोपीला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर तिची ‘जात वेगळी आहे’ असे सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी सुनील शालीकराम पराळे (वय २६, रा. मुळशी) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मार्च २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नेरे दत्तवाडी, ता. मुळशी येथे घडली. आरोपी आणि फिर्यादी महिला एका कंपनीत एकत्र काम करत होते. कामाच्या ठिकाणी झालेली ओळख पुढे मैत्रीत परिवर्तित झाली. याच मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आश्वासन दिले.
लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, काही दिवसांनंतर लग्न करण्यास नकार देताना आरोपीने ‘तुझी जात वेगळी आहे’ असे सांगत तरुणीची फसवणूक केली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील पराळेविरुद्ध फसवणूक, लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.