शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाला पावणेचार लाखांचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत विक्रोळीतील एका उच्चशिक्षित तरुणाची तब्बल पावणेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विक्रोळी परिसरात राहणारा सफिन कुरेशी (२१) हा अभियंता आहे. काही दिवसांपूर्वी सफिनला एका अनोळखी व्यक्तीकडून मोबाईलवर संदेश आला. त्या व्यक्तीने स्वतःला शेअर बाजारात काम करणारा सांगत त्याच्याकडे असलेल्या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. सफिनने त्याच्यावर विश्वास ठेवला.
यानंतर थोड्याच वेळात एका महिलेकडून सफिनला फोन आला. तिने स्वतःची ओळख करून देत शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती दिली. तिच्या सांगण्यावरून सफिनने विविध शेअर्स खरेदीसाठी एकूण ३ लाख ७५ हजार रुपये (पावणेचार लाख) भरले. मात्र काही दिवसांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर संबंधित ॲप फसवे असल्याचा संदेश सफिनच्या नजरेस पडला. यानंतर त्याने पैसे परत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ॲपमधून पैसे परत मिळत नव्हते. संबंधित महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा मोबाईल बंद आढळला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे सफिनच्या लक्षात आले. घटनेनंतर त्याने तातडीने पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलीसांचे आवाहन : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी संदेश, ॲप्स किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.