त्रिमुर्ती ज्वेलर्सच्या सोन्याच्या स्किम फसवणुकीत मुख्य आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – सोन्याच्या स्किममध्ये गुंतवणुकीवर मुद्दल अधिक व्याज किंवा सोन्याची वस्तू देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसवणूक करणाऱ्या त्रिमुर्ती रत्न ज्वेलर्स प्रकरणातील मुख्य आरोपीस ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे.
फसवणुकीचा प्रकार
माहे फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत त्रिमुर्ती रत्न ज्वेलर्स, शॉप नं. ३, पंचशील अपार्टमेंट, विष्णुनगर, संभाजी पथ, ठाणे येथील मालक आरोपी संतोष सदानंद शेलार (वय ५६) यांनी सोन्याचे स्किम राबवित फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन केला. “प्रती महिना १ हजार रुपये १५ महिने भरल्यास मुद्दल अधिक व्याज किंवा सोन्याचे दागिने मिळतील” असे सांगून त्यांच्याकडून ३०,००० रुपये घेतले. मात्र कालांतराने पैसे अथवा सोन्याच्या वस्तू परत न करता फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे येथे भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (एम.पी.आय.डी.) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.
न्यायालयाचा निकाल
सदर गुन्हयाची सुनावणी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जी. टी. पवार यांनी केली. त्यामध्ये:
मुख्य आरोपी संतोष सदानंद शेलार यास सीआरपीसी २४८(२) अन्वये दोषी ठरवून ७ वर्षे सश्रम कारावास व ५ लाखांचा दंड, दंड न भरल्यास २ वर्षे साधा कारावास अशी शिक्षा सुनावली तसेच एम.पी.आय.डी. कलम ३ प्रमाणे ६ वर्षे सश्रम कारावास व १ लाख दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावास ठोठावण्यात आला. इतर दोन आरोपी दिपक शांताराम गोपाळ व अनिल दिनकर शिंदे यांना पुराव्याअभावी सीआरपीसी २४८(१) अन्वये निर्दोष मुक्त करण्यात आले.
कायद्याची लढाई व पोलीसांची कामगिरी
या खटल्यात सरकारी अभियोक्ता श्री. विवेक कडू यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. तपासात तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. एम.एम. विसपुते (आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे), सहा. पोलीस निरीक्षक विद्या पाटील व त्यांचे तपास पथक तसेच कोर्ट पैरवी व समन्स/वॉरंट अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या भक्कम पुराव्यामुळेच न्यायालयाने मुख्य आरोपीस कठोर शिक्षा ठोठावली. या निर्णयानंतर पोलीस दलाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून अशा फसवणूक करणाऱ्या पॉन्झी स्किमविरोधात कायदा कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश या निकालातून मिळाला आहे.