सोशल मीडियावरील मैत्री ठरली महागात; नामांकित डॉक्टरची सेक्सटॉर्शनद्वारे ९४ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियावर वाढलेली ओळख आणि मैत्रीचा गैरफायदा घेत एका नामांकित डॉक्टरची तब्बल ९४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य सायबर सेल पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टर हे वडाळा येथे वास्तव्यास असून परळ येथील एका नामांकित रुग्णालयात सर्जन म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांची सोशल मीडियावर ‘सौम्या मनदिपसिंग अवस्थी’ नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. स्वतःला दिल्लीतील रहिवासी व चंदीगढ मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची विद्यार्थिनी म्हणून परिचय देत आरोपी महिलेने डॉक्टरांशी संवाद सुरू केला. हळूहळू मैत्री वाढवत तिने डॉक्टरांना सेक्स चॅटमध्ये गुंतवले आणि त्यांच्याकडून काही न्यूड फोटो व व्हिडिओही मिळवले. यानंतर मे महिन्यात महिलेने डॉक्टरांना एका वेबपेजची लिंक पाठवत सांगितले की, अज्ञात व्यक्तीने तिचा मोबाईल हॅक करून त्यांच्या सर्व चॅट्स, फोटो व व्हिडिओ मिळवले आहेत आणि अडीच कोटी रुपयांच्या बिटकॉईनची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास सर्व अश्लील मजकूर सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपी महिलेनेच डॉक्टरांकडून पैशांची मागणी सुरू केली. धमकीला घाबरून डॉक्टरांनी तिच्या सांगण्यानुसार विविध हप्त्यांत सुमारे ९४ लाख रुपये ट्रान्स्फर केले.
या दरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आले की, पैसे जॅस्मिन कौर नावाच्या महिलेच्या बँक खात्यात जमा होत आहेत. शंका आल्याने त्यांनी संबंधित खात्याबाबत माहिती शोधली असता, आरोपी महिलेचे सर्व सोशल मीडिया प्रोफाईल्स बनावट असल्याचे उघड झाले. अखेर त्यांनी सायबर हेल्पलाईन आणि मध्य सायबर सेल पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ‘सौम्या अवस्थी’ असे नाव सांगणाऱ्या तरुणीविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी अतिशय वैयक्तिक माहिती किंवा फोटो शेअर करू नयेत. सेक्सटॉर्शनच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून अशा प्रकारच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींनी तात्काळ सायबर हेल्पलाईन ‘१९३०’ वर संपर्क साधावा.