पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल; पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरू आहे का? – हर्षवर्धन सपकाळांचा संतप्त सवाल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच जर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहत असतील, तर हा ‘जंगलराज’च ठरतो, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे पोलिसांवर केली आहे. कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप असूनही दोषींवर कारवाई करण्याऐवजी पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल करण्याचा ‘अजब’ प्रकार पुण्यात घडला आहे.
नेमकं घडलं काय?
१ ऑगस्ट रोजी कोथरूड पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी तीन तरुणींना मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर “तुम्ही किती मुलांसोबत झोपलात?”, “तुम्ही लेस्बिअन आहात का?” असे अश्लील आणि घृणास्पद प्रश्न विचारल्याचाही तरुणींनी आरोप केला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित तरुणींनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. मात्र, १२ तासांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट पोलिसांनी पीडित मुलींच्याच विरोधात “सरकारी कामात अडथळा आणला” या कारणावरून गुन्हा दाखल केला. पोलिसांचा हा निर्णय म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली.
या प्रकरणामुळे पुण्यातील जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “मारहाण करणारे आणि जातीवाचक शिवीगाळ करणारे पोलिस मुक्त फिरत आहेत, पण त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या मुलींवरच गुन्हा दाखल केला जातो, हे लोकशाहीत लाजिरवाणे आहे,” असे सपकाळ म्हणाले. यामुळे पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरू झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
सदर तरुणींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांना न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांनी पोलीस आयुक्तालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनाच आरोपी ठरवले गेले. पोलिसांनी “तक्रार दाखल करता येणार नाही” असे पत्र देऊन त्यांना पाठवून दिले, अशीही माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आणि अन्यायकारक असल्याचे मत विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी काँग्रेसने राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.