कळव्यात पावसाचं रौद्ररुप,सर्व रस्ते जयलमय; शाळेतील मुलांना बोटीतून घरी सोडण्यात आलं
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यात थैमान घालणाऱ्या पावसाने आता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांच्या दिशेला मोर्चा वळवला आहे. या जिल्ह्यांमध्ये दिवसभर पाऊस होता. त्यानंतर रात्रभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. ठाणे जिल्ह्याला तर पावसाने चारही बाजूने झोडपून काढलं आहे. ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या स्थानकांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. ठाण्यातील मुसळधार पावसाचे रौद्ररुप दाखवणारे काही दृश्य समोर आले आहेत. असेच काही दृश्य ठाण्याच्या कळवा पूर्वेतून समोर येत आहे. इथे शाळेतील मुलांना घरी पाठवण्यासाठी अक्षरश: बोटीचा वापर करावा लागला आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.सोमवारी सकाळपासून पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी शिरलं. मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाचा अंदाज पाहता ठाण्यात दुपारनंतरच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. यानंतर शाळेतून घरी जाणाऱ्या लहान मुलांसाठी बोटीचा वापर करावा लागला.
कळवा पूर्वेतील शाळेत हा प्रकार घडला. दुपारी अचानक पाऊस वाढला. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी देण्यात आली. पण सर्व रस्ते हे पाण्याखाली गेले असताना एकही वाहन जाऊ शकत नव्हतं. अखेर मुलांना घरी सोडवण्यासाठी बोटीचा वापर करावा लागला. शाळेच्या लहान मुलांना बोटीतून घरी पोहोचवण्यात आलं. पालकांनी आपल्या मुलांना बोटीतून घरी नेलं. दरम्यान, ठाण्यात प्रचंड पाऊस पडतोय. ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पावसाचे पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे परिसरला नदीचे स्वरुप आले आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसतोय. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ठाणे महापालिकेकडून अनेक ठिकाणी पंप लावण्यात आले आहेत. पण तरीही पावसाचा फटका बसताना दिसतोय.