पुण्यात सर्वात मोठी कारवाई; राजु भाळे टोळीतील १३ जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
वालचंदनगर – पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण करून सातत्याने योजनाबद्ध गुन्हे करणाऱ्या कुख्यात राजु भाळे टोळीवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. या टोळीतील १३ सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.
खून प्रकरणातून उलगडला गुन्हेगारीचा माग
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे उत्तम जालिंधर जाधव (वय ३४, रा. खोरोची) यांची दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. तपासात या प्रकरणात १३ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला.
आरोपींची यादी
कारवाईतील आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ राजु महादेव भाळे, रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे, शुभम ऊर्फ दादा बापु आटोळे, स्वप्निल बबन वाघमोडे, नाना भागवत भाळे, निरंजन लहू पवार, तुकाराम ज्ञानदेव खरात, मयुर ऊर्फ जिजा मोहन पाटोळे, अशोक बाळू यादव, धनाजी गोविंद मसुगडे, सोमनाथ बबन पवार, सनी विलास हरिहर आणि अक्षय भरत शिंगाडे यांचा समावेश आहे.
कुख्यात गुन्हेगार राजु भाळे
राजु भाळे याच्यावर एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल असून तो इंदापूर, माळशिरस, नातेपुते परिसरात वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसक कारवाया करीत होता. टोळीला आळा घालण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ही मकोका कारवाई करण्यात आली.
पोलिसांची संयुक्त मोहीम
ही कारवाई पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, महेश बनकर, अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, प्रेमा सोनावणे आणि सचिन खुळे यांनी सहभाग घेतला.
‘गुन्हेगारीला पायबंद’ – पोलिसांचा इशारा
“समाजातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी येत्या काळात अधिकाधिक सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारांना आश्रय किंवा मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल,” असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिला.