प्रेयसीवर गोळ्या झाडल्या तसेच चार-पाच मुलींना मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडाचा अखेर पोलीसांनी उतरवला माज
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कुख्यात गुंडाचा माज चांगलाच उतरवला आहे. प्रेयसीला गोळ्या झाडून या गुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने पोलिसांसमोर मोठी धमकी दिली होती. जेलमधून सुटल्यावर आणखी चार-पाच मुलांना मारणार, अशी धमकी त्याने पोलिसांसमोर दिली होती. त्यामुळे त्याची किती हिंमत वाढली आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पोलिसांनी या गुन्हेगाराचं मुंडन केलं आणि त्याची रस्त्यावर धींड काढली. पोलिसांनी या माध्यमातून त्याचा चांगलाच माज उतवला आहे. हर्सूल कारागृहातून सुटतात कुख्यात गुंडाने प्रेयसीवर गोळीबार केला. यात प्रेयसी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अटक केल्यानंतर या गुंडाने पोलिसांसमोर धमकी दिली. जेलमधून सुटल्यानंतर आणखी चार-पाच मुलींना मारायचं आहे, अस तो म्हणत होता. दहशत माजवणाऱ्या या गुंडाची छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी त्याची दहशत असलेल्या किलेअर्क, बुडीलेन, कॅनॉट येथून धिंड काढत चांगलाच माज उतरवला. सय्यद फैजल सय्यद एजाज असे गोळीबार केलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. तो किलेअर्क इथला रहिवासी आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सय्यद फैजल उर्फ तेजा हा शहरातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार, शस्त्रसाठा, ड्रग्स तस्करी यासारखे १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच हर्सूल कारागृहातून बाहेर आला आहे. दरम्यान सोमवार रात्री आठ वाजेच्या सुमारास तेजा हा बेगमपुरा परिसरात होता. बेगमपुरात त्याने नशेत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो किलेअर्क परिसरात मैत्रिणीच्या घरात गेला. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. याचवेळी तेजाने थेट पिस्तूल काढत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावून आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. दुसऱ्या दिवशी आरोपीने पोलिसांसमोर जेलमधून बाहेर आल्यानंतर आणखी चार-पाच मुलींना मारायचं आहे, असं म्हणत धमकी दिली.
या घटनेनंतर माध्यमांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान पोलिसांनी आज फैसल उर्फ तेजाची दहशत असलेल्या किल्ले अर्क, बुडीलेन, कॅनॉट परिसरात धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी चर्चा शहरात सुरू होती. अशा गुंडांवर पोलिसांनी सातत्याने अशा कारवाई केल्या तर शहरातील गुन्हेगारी नष्ट होईल असं देखील बोलले जात आहे.