१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त
मुंबई – १५ ऑगस्ट २०२५ रोजी देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार असून, या दिवशी विविध धार्मिक मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून भक्कम बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली शहरभर ०६ अपर पोलीस आयुक्त, १७ पोलीस उप आयुक्त, ३९ सहायक पोलीस आयुक्तांसह २५२९ पोलीस अधिकारी व ११,६८२ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच महत्वाच्या ठिकाणी फोर्स वन, एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट तसेच होमगार्डचा कडक बंदोबस्त असणार आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगावा, बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे आणि सर्वांनी नियमांचे पालन करत उत्सव आनंदात व सुरक्षिततेने साजरा करावा. तातडीच्या मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन १०० किंवा ११२ वर संपर्क साधावा.