अरुण गवळीचा पीए असल्याची बतावणी करत ५ कोटींची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

Spread the love

अरुण गवळीचा पीए असल्याची बतावणी करत ५ कोटींची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – मी अरुण गवळीचा पीए बोलतोय, पाच कोटी दे’—असा धमकीचा फोन येताच एका बांधकाम व्यावसायिकाचे आयुष्य क्षणात अस्थिर झाले. परंतु गुन्हे शाखा आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही खंडणीखोर टोळी अखेर जेरबंद झाली आहे. या प्रकरणी सुमित चौरे, रोहन गवारे, सुदर्शन गायके, महेंद्र शेळके आणि कृष्ण बुधनर अशी आरोपींची नावे असून, त्यापैकी तिघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. हे आरोपी मूळचे बीड जिल्ह्याचे असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ माजली आहे. पुण्यातील ४९ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये आरोपी सुमित चौरे यांच्यासोबत एका बांधकाम प्रकल्पासंदर्भात व्यवहार झाला होता. मात्र, तो बांधकाम प्रकल्प अनधिकृत ठरल्याने पुणे महापालिकेने तो पाडला आणि संपूर्ण प्रकरण हे न्यायालयात गेले.

त्यानंतर २८ जुलै रोजी फिर्यादींना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. यावेळी फोन करणारी समोरची व्यक्ती म्हणाली की, “मी प्रशांत पाटील, अरुण गवळीचा पीए बोलत आहे.” त्यानंतर सुदर्शन गायके आणि त्याच्या साथीदारांनी वारंवार फोन करून ५ कोटी रुपये देऊन ‘मॅटर’ सेटल करण्याचा दबाव आणला, असा आरोप आहे. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवण्यात आलं होतं. तिथे सुदर्शन गायकेसोबत आलेल्या तिघांनी फिर्यादीला सरळ धमकी दिली, “पाच कोटी दे नाहीतर तुझा जीव घेऊ.” मात्र, पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. योग्य क्षणी कारवाई करत तिन्ही आरोपींना घटनास्थळीच पकडण्यात आलं होतं. या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ (३), ३०८ (४), ३५१ (३), ३५१ (४), ३५२ व ६१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon