जोशी बाईंना फिरण्याची आवड, टूर प्लानिंग करणाऱ्यानेच केला घात; ४८ तासात मृत्यूचं गूढ उलगडलं
योगेश पांडे / वार्ताहर
चिपळूण – चिपळूण तालुक्यातील धामणवणे-खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खून प्रकरणाचं अवघ्या ४८ तासात गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलं आहे. जोशी बाईंना फिरण्याची आवड होती. त्यांच्या आवडीचा गैरफायदा घेत त्यांना संपवण्याचा प्लान स्वत: टूर प्लानिंग करणाऱ्याने आखला. या प्रकरणात दोघांचा सहभाग असून त्यातील ट्रॅव्हल एजंट जयेश भालचंद्र गोंधळेकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेत या खून प्रकरणाची माहिती दिली. जोशी यांच्याकडील दागिने आणि पैसे याच्या हव्यासापोटी खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून पळवून नेलेले घरातील सीसीटीव्ही डिव्हीआर, संगणकातील हार्डडिस्क या एजंटकडून जप्त केली असून चोरीचे दागिने, काही रक्कम हस्तगत केली आहे. यशस्वी तपासाबद्दल जिल्हा पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जोशी या पर्यटनासाठी नेहमी बाहेर जात असत. काही दिवसांपूर्वीच त्या सिंगापूर येथून जाऊन आल्या होत्या. खूनापूर्वी त्या हैद्राबाद येथे जाणार होत्या. प्रत्येकवेळी पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या जोशी यांना टॅव्हल एजंट जयेश हा मदत करत होता. शिवाय तो त्यांच्या चांगला ओळखीचा होता. त्यामुळे जोशी यांच्याकडे असलेल्या संपत्तीबाबत जयेशला चांगलीच माहिती होती. त्यामुळे अन्य एका साथीदाराला घेऊन जोशी यांच्या खुनाचा कट रचला.