पुणे महापालिकेत मनसे कार्यकर्त्यांचा मोठा राडा; पोलिसांनी फरफटत नेलं
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे महापालिका कार्यालयात बुधवारी मोठा राडा झाला. मनसे नेते आणि पदाधिकारी महापालिकेत चांगलेच आक्रमक झाले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपल्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मनसे नेते किशोर शिंदे यांनी केला. याच प्रकरणी मनसे कार्यकर्ते बुधवारी रात्री महापालिकेत आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी संध्याकाळपासून महापालिकेत आंदोलन केलं. महापालिका आयुक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या बाहेर नेलं. यावेळी आंदोलकांनी आयुक्तलयाबाहेरही आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. आदोलक चांगलेच आक्रमक होत घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी यावेळी त्यांना फरफटत नेत ताब्यात घेतलं. पुणे महापालिकेचे माजी आयुक्त राजेंद्र भोसले हे पदावर असताना आयुक्तांच्या बंगल्यातील काही महागड्या वस्तू चोरीला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. तसेच त्याजागी नव्या वस्तूंसाठी २० लाखांचं टेंडर निघाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे या चोरीच्या घटनेप्रकरणी महापालिका आयुक्तांनी पोलीसात तक्रार केली नाही, असा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे मनसे नेते किशोर शिंदे या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी बुधवारी संध्याकाळी पुणे महापालिकेत दाखल झाले.
किशोर शिंदे महापालिकेत दाखल झाले तेव्हा सध्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची बैठक सुरु होती. यावेळी किशोर शिंदे यांनी आयुक्तांच्या दालनात जात किती वेळ लागेल? यासाठी विचारणा केली. आपल्याला चर्चा करायची असल्याची माहिती त्यांनी आयुक्तांना दिली. पण आयुक्तांनी कोण तू, इथे कसा आला? तुला घरात घुसून मारुन, तुला पुण्यातून बाहेर टाकून देईन, महाराष्ट्रातून बाहेर टाकून देईन, अशी धमकी दिल्याचा आरोप किशोर शिंदे यांनी केला. तसेच आयुक्तांनी मराठी भाषेवरुन अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याचा आरोप किशोर शिंदे यांनी केला. यावेळी किशोर शिंदे यांनी आपण १० वर्ष नगरसेवक राहिलो असून चार वेळा आमदारकी लढवली असल्याची माहिती आयुक्तांना दिली. त्यामुळे आपल्याशी व्यवस्थित बोलावं, असं आवाहन आयुक्तांना केलं. पण आपल्याला अपेक्षित प्रतिसाद आयुक्तांनी दिला नसल्याचा आरोप किशोर शिंदे यांनी केलं. यामुळे त्यांनी पुणे मनपात आंदोलन सुरु केलं. यावेळी मोठा वाद निर्माण झाला.