राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धडाडीचे आयएएस तुकाराम मुंढेंचा २० वर्षात २३ बदल्यांचा विक्रम
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या असंघटीत कामगार आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे ते सचिव असतील. तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पंसत नसल्याचं दिसून येतंय. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी एक वर्षेच काम करताना दिसून येतात.
गेल्या २० वर्षांच्या कालावधीत तुकाराम मुंढे यांचीही २३ वी बदली ठरली आहे. प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं दिसून येतंय.
कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
१)तुकाराम मुंढे – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२) नितीन काशीनाथ पाटील – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३)अभय महाजन – विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
४)ओंकार पवार – सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
५) आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.