मेट्रोच्या निष्काळजीपणाचा फटका! भिवंडीत रिक्षातून जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड शिरला; एमएमआरडीएची तातडीने कारवाई

Spread the love

मेट्रोच्या निष्काळजीपणाचा फटका! भिवंडीत रिक्षातून जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड शिरला; एमएमआरडीएची तातडीने कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो पाच मार्गिकेच्या कामादरम्यान घडलेली एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (५ ऑगस्ट २०२५) भिवंडीतील धामणकर नाका परिसरात मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान अचानक एक लोखंडी टाय रॉड खाली पडून, रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात घुसला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, रॉड दोन ते तीन इंच डोक्यात घुसला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

एमएमआरडीएकडून स्पष्टीकरण आणि तातडीची कारवाई

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, “सुमारे दोन महिने पूर्वी स्लॅब स्ट्रक्चरला डेक देण्यासाठी टाकलेल्या तात्पुरत्या आधार प्रणालीचा भाग असलेला टाय रॉड अचानक पडून हा अपघात घडला.” घटनेची माहिती मिळताच कंत्राटदार कंपनी मेसर्स अफकॉन्स आणि देखरेख करणाऱ्या मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा इंडियाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. एमएमआरडीएने कंत्राटदारास सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आदेश दिले असून पीडित तरुणाला संपूर्ण मदत करण्यात येणार आहे.

दंडात्मक कारवाई आणि चौकशी

या निष्काळजीपणाबद्दल एमएमआरडीएने मेसर्स अफकॉन्स या सिव्हिल कंत्राटदारावर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे, देखरेखीत त्रुटी झाल्यामुळे जनरल कन्सल्टंट कंपनी मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा (इंडिया) यांच्यावर ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एआयसीएचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशीच्या निष्कर्षांनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

नागरिकांमध्ये संतापाची भावना

या घटनेनंतर मेट्रो कामाच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये अशा प्रकारची निष्काळजीपणा होणे ही गंभीर बाब मानली जात असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एमएमआरडीएकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon