कल्याणमध्ये वेश्याव्यवसाय रॅकेट उध्वस्त – महिला दलाल अटकेत, एका पीडितेची सुटका
कल्याण – कल्याण परिसरात वेश्याव्यवसायासाठी महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेणाऱ्या एका महिला दलालाला ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अटक केली आहे. या कारवाईत एका असहाय्य पीडित महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.
३१ जुलै रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, “कॅम्पस कॉर्नर बिल्डिंग समोर, शहाड स्टेशन रोड, कल्याण” येथील फुटपाथवर ही महिला एका पीडित महिलेला वेश्याव्यवसायासाठी बोलवणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी तत्काळ सापळा रचून महिला दलालाला रंगेहात पकडले.
खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(१) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) श्री. विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वपोनि वैशाली गोरडे, मपोउपनि स्नेहल शिंदे, श्रेपोउपनि क्षिरसागर, सपोउपनि डी. के. वालगुडे, पोहवा के. बी. पाटील, आर. यु. सुवारे, मपोअमं पी. जी. खरात, एच. आर. थोरात आणि चापोशि एस. सी. पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला.