खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक; ५ लाखांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडले
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी ५० लाखांच्या खंडणीप्रकरणी अटक केली आहे. एका बांधकाम प्रकल्पातील ठेकेदाराकडून पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली असून, (शुक्रवार) दुसऱ्या टप्प्यातील ५ लाख रुपये स्वीकारताना राय यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमलेश राय यांनी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडे एकूण ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ लाख रुपये स्वीकारण्यात आले होते. या व्यवहारानंतर ठेकेदाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ तपास करून सापळा रचला आणि आज, दुसऱ्या टप्प्यातील ५ लाख रुपये स्वीकारतानाच राय यांना अंधेरी एमआयडीसी परिसरात अटक केली.
पोलिसांनी राय यांच्याकडून रोख रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे शिंदे गटासाठीही राजकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.