मुख्य निरीक्षण अधिकारी लाच घेताना अडकला! लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईची धडक कारवाई; १.७५ लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई युनिटने एक मोठी कारवाई करत नागरी पुरवठा विभागातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक वसंत निकम (वय ५४) यांना १.७५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार हे कांदिवली येथील एका गॅस एजन्सीत मॅनेजर असून, त्यांच्या नातेवाईकांची गॅस एजन्सी ठाण्यात देखील आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत या दोन्ही एजन्सींवर नागरी पुरवठा विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई थांबवण्यासाठी आरोपीने दरमहा ₹२.५ लाख लाचेची मागणी केली होती – त्यात कांदिवलीसाठी ₹१.५ लाख आणि ठाण्यासाठी ₹१ लाख असा समावेश होता.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईकडे तक्रार दाखल केल्यानंतर २५ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी अधिकाऱ्याने दरमहा १.७५ लाख रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २९ जुलै रोजी सापळा रचण्यात आला आणि आरोपीला पंचासमक्ष लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक २५/२०२५ आहे.
सदर कारवाई श्रीमती सुनिता दिघे, पोलीस निरीक्षक,तपास अधिकारी मनोज सुतार, सहायक पोलीस आयुक्त, मार्गदर्शन संदीप दिवाण, अनिल घेरडीकर व राजेंद्र सांगळे (अपर पोलीस उप आयुक्त), सक्षम अधिकारी: मा. सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय यांच्या पथकाने केली.