चित्रपट निर्मात्याचा सायबर फसवणुकीत सहभाग; ५८ लाखांच्या गंड्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून अटक

Spread the love

चित्रपट निर्मात्याचा सायबर फसवणुकीत सहभाग; ५८ लाखांच्या गंड्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून अटक

पोलीस महानगर नेटवर्क 

पिंपरी : सायबर गुन्ह्यांत झपाट्याने वाढ होत असताना, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केलेल्या एका धाडसी कारवाईत चित्रपट निर्माता शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (रा. एरंडवणे, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर उद्योगनगरीतील एका व्यक्तीकडून तब्बल ५८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका चिनी नागरिकाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली असून, त्याचे बँक खाते आणि मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.

गुंतवणुकीचे आमिष, कोटींचा नफ्याचा दावा!

या प्रकरणातील फिर्यादी व्यक्ती यूट्यूबवर शेअर बाजारासंदर्भातील व्हिडीओ पाहत असताना त्यांना त्याखालील लिंकवरून गुंतवणुकीचा प्रस्ताव मिळाला. व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू झाला आणि ‘Abbott Wealth’ या अ‍ॅपवर नोंदणी करून गुंतवणूक केल्यास काही महिन्यांत मोठा नफा मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार संबंधित व्यक्तीने ५७ लाख ७० हजार ६७० रुपयांची गुंतवणूक केली.

५ कोटींचा नफा दाखवून… फसवणुकीचा जाळं

थोड्याच दिवसांत संबंधित अ‍ॅपवर ५ कोटी १५ लाखांचा बनावट परतावा दाखवण्यात आला, मात्र ते पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध कारणांनी पैसे अडकवण्यात आले. शिवाय विविध शुल्कांच्या नावाखाली अजून पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तपासात उघड झालेली चकित करणारी माहिती

शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. त्यात गुंतवणूक केलेली रक्कम IDFC बँकेच्या ‘बालाजी एंटरप्रायझेस’ या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले, जे शिवम संवत्सरकार याच्या नावावर आहे. सुरुवातीला “मी चित्रपट निर्माता आहे, अशा प्रकारच्या व्यवहारांशी माझा संबंध नाही” अशी उडवाउडवी त्याने केली. मात्र, पोलिसांच्या सखोल चौकशीत त्याने ‘बाम्बिनो’ नावाच्या चिनी व्यक्तीच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आणखी अनेकांची फसवणूक?

संवत्सरकारच्या खात्यावर आधीपासूनच १५ वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याने अशाच पद्धतीने इतर अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असण्याचा संशय आहे. यासाठी त्याने आणखी दोन बँक खाती उघडल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी त्याचे २ मोबाईल जप्त केले असून, खात्यातून एकूण ८६ लाख ४३ हजार ११९ रुपयांची उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले आहे.

पुढील तपास सुरु

या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि शंका आल्यास त्वरित सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon