“पोलिसांनीच पुरावे पेरले, कोकेन ठेवलं अन् व्हिडीओ व्हायरल केला; पुणे पोलिसांवर खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात कटकारस्थानाचा आरोप!” – असीम सरोदे यांचा गंभीर दावा

Spread the love

“पोलिसांनीच पुरावे पेरले, कोकेन ठेवलं अन् व्हिडीओ व्हायरल केला; पुणे पोलिसांवर खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात कटकारस्थानाचा आरोप!” – असीम सरोदे यांचा गंभीर दावा

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे -एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पुणे पोलिसांनी नुकत्याच झालेल्या तथाकथित ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणात अटक केली आहे. यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, खेवलकर यांना अडकवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप खडसे कुटुंबियांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत प्रकरणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, “पोलिसांनीच पुरावे पेरले. कोकेन मुद्दाम ठेवलं, व्हिडीओ व्हायरल करून एक बनावट चित्र निर्माण केलं.”

असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, खेवलकर यांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करत त्यांच्या अधिकारांचा पोलिसांनी भंग केला आहे. “घरात दारू पिणं हा कायद्याने गुन्हा नाही, पण त्याला रेव्ह पार्टीचा स्वरूप देत समाजासमोर गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न झालाय,” असा आरोप त्यांनी केला.

पोलिसांनी ‘दृश्यम’ चित्रपटासारखा बनाव केला?

सरोदेंच्या मते, “पोलिसांनी ‘दृश्यम’ चित्रपटात दाखवलेल्याप्रमाणे कट रचून खोटं चित्र उभं केलं. व्हिडीओ कोर्टात सादर होण्याआधीच व्हायरल झाला. हे सर्व नियोजनबद्ध आहे.”

पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केलाय. पण प्रत्यक्षात ७ मिलीग्रॅम कोकेन जास्त भरल्याचं दाखवून आरोपींना जामीन न मिळावा यासाठी खेळी केली गेल्याचा सरोदेंचा आरोप आहे.

रेव्ह पार्टी की फक्त खाजगी गेट-टुगेदर?

सरोदेंनी स्पष्ट केलं की, “रेव्ह पार्टी म्हणजे मोठ्या आवाजात संगीत, मोठा जमाव, नशिले पदार्थ, तोकड्या कपड्यांमध्ये लोक – असं दृश्य असतं. पण खेवलकर यांच्या घरी फक्त बिअर, दारू प्राशन चालू होतं.” त्यामुळे या प्रकरणाला ‘रेव्ह पार्टी’ चा आभास निर्माण करणं ही पोलिसांची अतिशयोक्ती असल्याचं त्यांनी नमूद केलं.

प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

या प्रकरणात अनेक पातळ्यांवर गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप करत सरोदेंनी स्पष्ट केलं की, हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जी कृती केली ती त्यांच्याच अंगलट येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

खेवलकर प्रकरणात आता पोलिसांविरुद्धच कटकारस्थानाचे आरोप होत असल्याने, या गुन्ह्याची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon