१० घरफोड्यांचा उलगडा; अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या, १०.९९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे शहरातील घरफोड्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी पोलिसांनी दिलासा देणारी कामगिरी बजावली आहे. नौपाडा पोलिसांनी अट्टल व सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करत त्याच्याकडून तब्बल १० लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपीकडून १० घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक १४ जुलै २०२५ रोजी फिर्यादी अतुल शरदचंद्र मराठे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या अनुपस्थितीत १३ जुलै रोजी दुपारी १.३० ते रात्री १०.३० च्या दरम्यान घराचे कुलूप तोडून ७.९९ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. त्यावरून गु.र.नं. ६००/२०२५ भा.न्या.स. कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपास अधिकारी सपोनि मंगेश भांगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका महिलेच्या मदतीने गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले. सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिवा येथील डंपिंग ग्राउंडजवळील परिसरात दोन दिवस सलग गुप्त पाळत ठेऊन संशयिताचा माग काढला. १७ जुलै २०२५ रोजी रात्री ११.५० वा., पोलीस तपास पथकाने गणेश दिलीप गुप्ता उर्फ गणेश प्रकाश आव्हाड (वय २० वर्षे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे हस्तगत करण्यात आली. चौकशीत आरोपीने त्याची आई पूजा दिलीप गुप्ता उर्फ पूजा प्रकाश आव्हाड (वय ४५ वर्षे) हिच्यासह ठाणे शहरातील विविध भागांमध्ये अनेक घरफोड्यांची कबुली दिली. आरोपीकडून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, २.५ किलो चांदीची भांडी व दागिने, रु. ४०,०००/- रोख रक्कम, तसेच घरफोडीचे हत्यारे जप्त करण्यात आले. सदर आरोपीकडून १० गुन्हे उघडकीस आले असून त्यानुसार…
१. गु.र.नं. ५९९/२०२५ – कलम ३०५, ३३१(३)
२. गु.र.नं. ६०४/२०२५ – कलम ३०५, ३३१(३), ३३१(४)
३. गु.र.नं. ४९९/२०२५ – कलम ३०५ (अ)
४. गु.र.नं. ६००/२०२५ – कलम ३०५, ३३१(३), ३३१(४)
५. गु.र.नं. २६०/२०२४ – भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०
६. गु.र.नं. ९३२/२०२४ – कलम ३०५, ३३१(३), ३३१(४)
७. गु.र.नं. ११३३/२०२४ – कलम ३०५, ३३१(४)
८. गु.र.नं. ९५३/२०२४ – कलम ३०३(२), ३२४(४)
९. गु.र.नं. १११०/२०२४ – कलम ३०३(२)
१०. गु.र.नं. १०५७/२०२४ – कलम ३०३(२)
सदर कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ १ सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय दवणे, पोनि सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश भांगे, तसेच पोलीस अंमलदार गायकवाड, देसाई, गोलवड, तडवी, माळी, कांगणे, तिर्थकर यांनी केली. ठाणे पोलिसांनी दाखवलेली दक्षता आणि काटेकोर तपासकार्यामुळे शहरातील घरफोडीच्या मालिकेला चाप लागण्याची शक्यता आहे.