३५ वर्षांनंतर न्याय मिळाला!
१९८० च्या दशकातील केरोसिन रॅकेट प्रकरणात आरोपी सावले यांची निर्दोष मुक्तता
रवि निषाद / मुंबई
मुंबई – तब्बल ३५ वर्षांनंतर न्यायालयात एक ऐतिहासिक निकाल देण्यात आला. १९८० च्या दशकात गाजलेल्या केरोसिन रॅकेट प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेल्या श्री सावले यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या काळात आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे अन्वेषण विभाग यांनी मोठ्या प्रमाणावर काळ्या बाजारातील केरोसिन पुरवठा, वितरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणात श्री सावले यांना मुख्य संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर विशेष न्यायालयात खटला चालू झाला. गुरुवार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी या दीर्घकालीन खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. श्री सावले यांचे वकील अधिवक्ता राज लहु कांबळे यांनी खटल्यात प्रभावी व सखोल युक्तिवाद सादर करत साक्षी-पुराव्यांवर काटेकोरपणे प्रकाश टाकला. युक्तिवादानंतर माननीय विशेष सत्र न्यायालयाने श्री सावले यांच्यावर असलेल्या सर्व आरोपांना कोणताही ठोस आधार नसल्याचे मान्य करून त्यांची निर्दोष मुक्तता जाहीर केली.
तब्बल तीन दशके प्रलंबित असलेल्या खटल्यातून शेवटी न्याय मिळाल्याबद्दल श्री सावले यांनी आपल्या भावनाही व्यक्त करत न्यायालय आणि आपल्या वकिलांचे आभार मानले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन यंत्रणा व वकिलांच्या संयमाचे व कार्यक्षमतेचे कौतुक होत असून, अशा अनेक प्रलंबित खटल्यांवर लवकरात लवकर सुनावण्या व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.