चेंबूर तिलक नगर पोलिसांची उत्तम कामगिरी!
दर्जनभर हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे परत; विविध राज्यांतून मिळवले मोबाईल
रवि निषाद / मुंबई
मुंबई – चेंबूर येथील तिलक नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे व सायबर पथकाने एक कौतुकास्पद कामगिरी पार पाडली आहे. तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या जोरावर हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढत तब्बल १२ मोबाईल फोन मूळ मालकांकडे परत करण्यात आले आहेत.
सीईआयआर सेल पोर्टलच्या सहाय्याने मोबाईल क्रमांक व आयएमईआयI नंबरच्या आधारे विविध राज्यांतील मोबाईल वापरकर्त्यांचा माग काढण्यात आला. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमधून मोबाईल शोधून काढण्यात आले. ही संपूर्ण कामगिरी चेंबूर परीमंडळ ६ चे पोलीस उप आयुक्त समीर शेख, तिलक नगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आबुराव सोनावणे तसेच चेंबूर तिलक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोबाईल मिसिंग व सायबर पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून तक्रारदारांची हरवलेली मोबाईल परत मिळवून दिली.
दिनांक २१ जुलै २०२५ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात सर्व मोबाईल तक्रारदारांना त्यांच्याच हस्ते परत करण्यात आले. मोबाईल मिळाल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले. या कामगिरीमुळे चेंबूर तिलक नगर पोलिसांचे नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचे बळकटीकरण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.