विदेशी बनावटीच्या पिस्तूलसह इसम अटकेत, डी एन नगर पोलिसांची धडक कारवाई
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील गोल्ड वेस्ट इन हॉटेलमध्ये विदेशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, चार जिवंत काडतुसे आणि रामपुरी चाकू बाळगणाऱ्या एका संशयित इसमाला अटक करून डी एन नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सदर कारवाई १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.५० वाजता करण्यात आली. या प्रकरणी डी एन नगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ८५३/२०२५ कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा तसेच कलम ३७(१)(अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस शिपाई विनोद बाबुराव गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समजले की, गुन्हे प्रकटीकरण पथक व ए.टी.सी. पथक गस्त घालत असताना खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरी पश्चिम येथील गोल्ड वेस्ट इन हॉटेलच्या रूम क्रमांक १०३ मध्ये छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी अकरम रफिक मोहम्मद खान उर्फ चिटकु काला (वय २९, रा. गोहर नगर, इंदोर, मध्यप्रदेश) हा आढळून आला. त्याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्टल (किंमत सुमारे रु.८०,०००), एक मॅगझीन, चार ७.६५ केएफ जिवंत काडतुसे (किंमत सुमारे रु. २,०००), लोखंडी पाते असलेला रामपुरी चाकू (किंमत रु. २,५००) एकूण हस्तगत मालमत्ता किंमत : रु. ८४,५०० इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून, आरोपीचा पूर्वगुन्हेगारी इतिहास शोधण्यात येत आहे. सध्या त्याच्या विरोधात कोणतीही पूर्वीची प्रतिबंधक कारवाई आढळून आलेली नाही. पाहिजे आरोपींचा शोधही सुरू आहे. ही महत्त्वाची कारवाई स.पो.नि. सुनित घाडगे, पो.उ.नि. नागनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण व दहशतवादी विरोधी पथकाने केली. संपूर्ण ऑपरेशन पोलीस उपायुक्त परिमंडळ ०९ श्री. दिक्षीत गेडाम व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती कल्पना गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डी एन नगर पोलिसांच्या या धाडसी व प्रभावी कारवाईमुळे अंधेरी परिसरात निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका टळला असून, पोलिसांचे सतर्कतेचे आणि तत्परतेचे कौतुक होत आहे.